रणबीरच्या ‘ॲनिमल’ची जबरदस्त चर्चा; दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनेही पोस्टर शेअर करत दिली प्रतिक्रिया

मनोरंजनसृष्टीतील इतर कलाकारांनीही रणबीरचं कौतुक केलं आहे

 

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवरील रणबीरचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता, आता त्याच्या याच नवीन चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या पोस्टरमध्ये रणबीर पांढऱ्या कपड्यात दिसत आहे, आणि त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला आहे, हातावर जखम आहे, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड दिसत आहे जी रक्ताने माखलेली आहे. वाढलेली दाढी आणि केस, रक्ताने माखलेले हात अशा डॅशिंग अवतारातही रणबीर पोस्टरवर सिगारेट शिलगवताना दिसत आहे.

रणबीरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. त्याचा हा लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. मनोरंजनसृष्टीतील इतर कलाकारांनीही रणबीरचं कौतुक केलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनेही या पोस्टरचं कौतुक केलं आहे. प्रभासला हे पोस्टर चांगलंच पसंत पडलं असून त्याने ते त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.