चाहत्यांच्या गर्दीमुळे ऋषभला विश्रांतीही मिळत नाही; पंतच्या कुटुंबीयांची तक्रार

शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मात्र, आमदार, मंत्री, अधिकारी आणि अभिनेत्यांसह चाहत्यांच्या गर्दीमुळे त्याला विश्रांती मिळत नसल्याची तक्रार करत रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ

याबाबत बोलताना, “नियमानुसार रुग्णांना भेटण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ तसेच दुपारी ४ ते ५ अशी वेळ आखून देण्यात आली असून ऋषभ पंत क्रिकेटपटू असल्यानेच ही समस्या निर्माण होते आहे”, अशी प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. तसेच यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

“ऋषभला विश्रांतीची गरज”

“ऋषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत अभिनेता अनुपम खेर, अनिल कपूर, क्रिकेटपटू नितीश राणा, खानपूरचे आमदार उमेश कुमार याचबरोबर स्थानिक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन ऋषभ पंतची भेट घेतली आहे.